रात्री 10 नंतर रेल्वेत लागू होतात हे 5 महत्त्वाचे नियम! जाणून घ्या तुमचे हक्क
रात्रीच्या रेल्वे प्रवासात मिडल बर्थ, टीटीई, दिवे, आवाज आणि तक्रार प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

Indian Railway Night Rules
रात्रीच्या वेळेला रेल्वेमधून प्रवास करत असताना रेल्वेचे काही नियम आहेत,
ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो. रात्रीच्या वेळेला
असे कोणते नियम आहेत की, जे तोडल्यास तुम्हाला दंडही होऊ शकतो?

भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्या या रात्रीच्या असतात, त्यामुळे रात्री
आरामदायी झोपेसाठी आपण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती देतो. पण रात्री 10 नंतर रेल्वेचे काही नियम लागू होतात. हे
जाणून घेणे आपल्यासाठी फार गरजेचे आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रेल्वेचे काही नियम आहेत.
रात्री 10 नंतर जोरजोरात फोनवर बोलणे किंवा मोबाईलवर गाणी ऐकणे, मिडल बर्थचे नियम
काय आहेत, हे जाणून घेऊया भारतीय रेल्वेचे नाईट जर्नी रुल्स.
1) मिडल बर्थ वापरण्याचे नियम
रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये एका बाजूला तीन बर्थ असतात. यामध्ये लोअर बर्थ, मिडल बर्थ आणि अप्पर बर्थ असतो.
यातील अप्पर बर्थवर आपण कधीही झोपू शकतो, पण लोअर आणि मिडल बर्थला काही नियम आहेत.
विशेष करून मिडल बर्थ उघडण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा नियम आहे.
या दरम्यानच फक्त मिडल बर्थचा वापर करता येतो. रात्री 10 च्या आधी किंवा सकाळी 6 च्या आधी मिडल बर्थचा वापर करता येत नाही.
2) मोठ्या आवाजात बोलणे किंवा गाणे ऐकणे
रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी ऐकणे किंवा बाजूच्या प्रवाशाशी मोठ्याने
बोलणे हे देखील रेल्वेच्या एका नियमाचे उल्लंघन आहे. कारण रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 नंतरचा वेळ हा झोपेसाठी असतो.
हेही वाचा-पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? काय खावे, काय टाळावे आणि आयुर्वेदिक उपाय
त्यामुळे रात्री 10 नंतर मोठ्याने बोलणे किंवा मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी
ऐकणे हा देखील एक दंडनीय प्रकार आहे. प्रवास करताना आपल्या
सहप्रवाशाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
3) रात्री 10 वाजेनंतर दिवे बंद केले पाहिजेत
कधीकधी एखाद्या प्रवाशाला रात्री उशिरापर्यंत पुस्तक वाचायचे असते आणि तो डब्याचा मुख्य दिवा चालू ठेवतो, ज्यामुळे
इतरांना गैरसोय होते. रेल्वेच्या नियमांनुसार रात्री 10 वाजल्यानंतर डब्यातील सर्व मुख्य दिवे बंद करणे बंधनकारक
आहे. रात्री फक्त नाईट लाईटचा बल्ब लावण्याची परवानगी आहे.
जर कोणाला वाचायचे असेल किंवा काही महत्त्वाचे काम करायचे असेल,
तर ते त्यांच्या आसनाजवळ लावलेला वैयक्तिक वाचन दिवा वापरू शकतात.
4) टीटीई तुमचे रात्री तिकीट तपासू शकत नाही
रात्री 10 नंतर रेल्वेचे अधिकारी, म्हणजेच टीटीई, तुमचे तिकीट तपासू शकत नाहीत.
जर तुम्ही रात्री 10 नंतर प्रवास सुरू केला असेल, तर मात्र ते तुमचे तिकीट तपासू शकतात.
पण ते देखील इतर प्रवाशांना कोणताही त्रास न होता. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत
तिकीट तपासणीसाठी टीटीई तुम्हाला झोपेतून उठवून तुमचे तिकीट तपासू शकत नाही.
5) केटरिंग आणि विक्रेता नियम
रेल्वे विक्रेते किंवा फेरीवाले रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये मोठ्याने वस्तू विकू शकत नाहीत.
मात्र, जर तुम्ही ई-केटरिंगद्वारे जेवणाची पूर्व-ऑर्डर दिली असेल, तर ते तुमच्या सीटवर पोहोचवले जाईल.
जर कोणी नियम तोडल्यास काय करावे
वर दिलेले एखादे नियम जर कोणी तोडत असेल, तर काय करावे हा प्रश्न आपल्यासमोर येईलच.
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वरील सर्व नियम मोडल्यास आपण याची तक्रार कोचमध्ये असलेल्या टीटीई, रेल्वे पोलीस
किंवा कोच अटेंडंट यांच्याकडे करू शकता. ही रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे
की त्यांनी तुमच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि तुमची समस्या सोडवावी. याशिवाय आपण ऑनलाइन देखील तक्रार दाखल करू शकतो.
तुम्ही ‘रेलमदत’ (RailMadad) वर तात्काळ ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर
कॉल करू शकता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेकडून दंडही आकारला जाऊ शकतो.
भारतीय रेल्वेचे हे नियम प्रत्येक प्रवाशाला कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक त्रासाशिवाय आरामात प्रवास करता यावा
यासाठी तयार करण्यात आले आहेत. पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना या
नियमांचे पालन करा आणि आवश्यकतेनुसार आपल्या हक्कांचा वापर करा.
वरील सर्व नियम व तक्रार कुठे करायची याबाबत सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली आहे.
यामुळे आपला प्रवास नक्कीच सुखकर होईल. आपल्या हक्काची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.
जर कोणी वरील नियम मोडत असेल, तर आपण तक्रार करू शकतो. याचा निश्चित फायदा आपल्याला होईल.
यामुळे आपला रात्रीचा प्रवास सुखकर होईल. तरी हे नियम कायम लक्षात ठेवा.







