जगन्नाथ पुरी रथयात्रा २०० मीटरवर का थांबते? मुस्लिम भक्त सालबेग यांच्या भक्तीमागील भावस्पर्शी आख्यायिका
जगन्नाथ पुरीची रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही अंतरावर का थांबते? भगवान जगन्नाथांचे मुस्लिम भक्त सालबेग कोण होते आणि त्यांच्या समाधीजवळ रथ थांबवण्याची परंपरा का पाळली जाते, जाणून घ्या.

देशात प्रसिद्ध असलेली रथयात्रा म्हणजे जगन्नाथ रथयात्रा. ही यात्रा जेव्हा निघते,
तेव्हा एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. रथयात्रा जेव्हा निघते, तेव्हा अंदाजे दोनशे
मीटर अंतरावर थांबते, थोडा विश्राम करते आणि त्यानंतर पुन्हा पुढे चालू होते.
पण नेमके काही वेळासाठी ही यात्रा का थांबते? यामागे कोणती परंपरा आहे, याविषयी जाणून घेऊया.
ही रथयात्रा ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथून आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी काढण्यात येते.
या यात्रेसाठी देशातून तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणात भक्त येतात.
जगातील सर्वात मोठी रथयात्रा म्हणून या रथयात्रेकडे पाहिले जाते.
आपल्या प्रभूंचा रथ ओढण्यासाठी प्रत्येक भाविक उत्सुक असतो.
हेही वाचा-शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण अनिवार्य होणार? केंद्र सरकारची तयारी; सर्वोच्च न्यायालयात मोठी माहिती
पण ही यात्रा निघाल्यानंतर २०० मीटरवर का थांबते? याचे कारण म्हणजे
भगवान जगन्नाथाचे भक्त सालबेग यांची समाधी. त्यामुळे तेथे काही वेळ ही यात्रा थांबते.

जगन्नाथ पुरी रथयात्रा का काढली जाते?
ओडिशातील जगन्नाथ पुरीची रथयात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक मानली जाते.
आख्यायिकेनुसार, भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण), त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा
वर्षातून एकदा आपल्या मावशीच्या घरी, म्हणजेच गुंडिचा मंदिरात जातात.
या प्रवासाचे प्रतीक म्हणून भव्य रथयात्रा काढली जाते. आणखी एका मान्यतेनुसार,
कुरुक्षेत्र येथे जाण्याची श्रीकृष्णाची इच्छा आणि भक्तांना सहज दर्शन देण्याचा संदेश या यात्रेतून व्यक्त होतो.
रथयात्रेदरम्यान लाखो भाविक स्वतः रथ ओढतात. रथाची दोरी ओढल्याने पुण्य प्राप्त होते
आणि पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. श्रद्धा, समता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून जगन्नाथ पुरीची रथयात्रा जगभर प्रसिद्ध आहे.
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97
चला तर मग, जाणून घेऊया की सालबेग कोण होते, ज्यांच्या समाधीजवळ आजही रथयात्रा थांबते.

एका मुस्लिम कुटुंबात सालबेग यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव तालबेग होते.
ते मुघल साम्राज्यात उच्चपदस्थ अधिकारी होते. सालबेग यांचे शिक्षण पूर्ण झाले.
एकदा ते एका कामासाठी ओडिशामधील पुरी येथे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी भगवान जगन्नाथांची महती ऐकली आणि
भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण या मंदिरामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जात
असल्यामुळे सालबेग यांना प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर सालबेग यांनी भगवान जगन्नाथांबद्दल माहिती गोळा करण्यास
सुरुवात केली आणि ते भगवान जगन्नाथांच्या भक्तीत तल्लीन झाले. भजन, कीर्तन, जप आणि तप ते करू लागले.
सालबेग यांच्या भेटीसाठी स्वतः भगवान आले
भगवान जगन्नाथांच्या भक्तीत तल्लीन झालेले सालबेग यांनी अनेक वर्षे जप-तप केले.
एके दिवशी रात्री स्वतः भगवान जगन्नाथ सालबेग यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सालबेग यांना सांगितले,
“मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला मंदिरात प्रवेश मिळाला नाही,
तरीसुद्धा मी तुला दर्शन देण्यासाठी येईन.” त्यावेळी सालबेग यांनी विचारले, “कधी?”
त्यावर भगवान जगन्नाथ म्हणाले, “ज्या वेळी माझी रथयात्रा निघेल,
त्या वेळी मी स्वतः तुझ्या दारापुढे येऊन तुला दर्शन देईन.”
काळ लोटला आणि एके दिवशी रथयात्रा आली. भगवान जगन्नाथांचा रथ सालबेग राहत असलेल्या ठिकाणी पोहोचताच
अडकला. हजारो लोकांनी एकजुटीने प्रयत्न करूनही रथ पुढे सरकवू शकले नाहीत. मग भगवान जगन्नाथांची फुलांची माळ
सालबेग यांच्यासाठी आणण्यात आली. तेव्हाच रथ पुढे सरकला. लोकांच्या लक्षात आले
की हा योगायोग नव्हता; उलट भगवान स्वतः आपल्या भक्तासमोर प्रकट झाले होते.
एका खऱ्या भक्ताला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याबद्दल पुजाऱ्यांनाही पश्चात्ताप झाला.
देवाच्या द्वारात भेदभाव नसतो
सालबेग यांच्या कथेवरून तुमच्या लक्षात येईल की देवाच्या दारी भेदभाव नसतो.
तेथे जातीपातीचे बंधन नसते. यानंतर सालबेग प्रभूंची सेवा करू लागले आणि १६४६
मध्ये सालबेग यांचे निधन झाले. तत्कालीन पुरीच्या राजांनी त्या ठिकाणी एक मंदिर
बांधले आणि आज ते मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आजही सालबेग यांच्या
समाधीजवळ काही वेळासाठी जगन्नाथ पुरी रथयात्रा थांबवली जाते आणि त्यानंतर पुढे जाते.
पाहिलंत, जो खऱ्या मनाने देवाची भक्ती करतो, त्याला देव सर्व काही देतो.
असेच काही एका मुस्लिम समाजातील युवकासोबत घडले. त्यांनी केलेली भक्ती,
त्यानंतर स्वतः भगवान जगन्नाथांनी दिलेले दर्शन आणि आजही सालबेग यांच्या समाधीजवळ
थांबणारी जगन्नाथ पुरी रथयात्रा यावरून हे स्पष्ट होते की देव जात, पात आणि धर्म मानत नाही.
या सर्व मानवनिर्मित कल्पना आहेत. खरी भक्ती केल्यानंतर भगवंताची भेट नक्कीच होते.
त्यामुळे सर्व गोष्टी विसरून आपण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊया.
सतत विचारले जाणारे प्रश्न
FAQ (Frequently Asked Questions)
1. जगन्नाथ पुरी रथयात्रा २०० मीटर अंतरावर का थांबते?
जगन्नाथ पुरी रथयात्रा भगवान जगन्नाथांचे महान भक्त सालबेग यांच्या समाधीजवळ काही काळ थांबते.
भगवान जगन्नाथांनी आपल्या भक्ताला दर्शन देण्याचे दिलेले वचन आणि
त्याच्या भक्तीचा सन्मान म्हणून ही परंपरा आजही पाळली जाते, अशी श्रद्धा आहे.
2. सालबेग कोण होते?
सालबेग हे मुस्लिम कुटुंबात जन्मलेले भगवान जगन्नाथांचे महान भक्त होते.
मंदिरात प्रवेश न मिळाल्यानंतरही त्यांनी अखंड भक्ती, जप, तप आणि भजन केले.
त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान जगन्नाथांनी त्यांना रथयात्रेदरम्यान दर्शन दिल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
3. जगन्नाथ पुरी रथयात्रा का काढली जाते?
आख्यायिकेनुसार, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा वर्षातून एकदा गुंडिचा मंदिरात,
म्हणजेच आपल्या मावशीच्या घरी जातात. या प्रवासाचे प्रतीक म्हणून दरवर्षी भव्य रथयात्रा काढली जाते.
श्रद्धा, समता आणि भक्तीचा संदेश देणारा हा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे.







