महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका आणि हरवलेला विरोधी पक्ष ?
सत्तेसाठी युतींचे,आघाडीचे राजकारण

सध्या सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकांची चर्चा आहे. जागा वाटपाचा फार्म्युला हा जवळपास निश्चित झाला आहे. पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या युती-आघाडीमुळे मात्र विरोधी पक्षाचे अस्तित्व संपले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या मागचे नेमके कारण काय आहे, ते पाहूया.
विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र
प्रत्येक पक्षाची एक तत्वे असतात आणि त्यावर तो पक्ष चालत असतो. आपण त्याला इंग्रजीमध्ये आयडॉलॉजी असे म्हणतो. पण मागील काही घडामोडी पाहता प्रत्येक पक्षाने आपली तत्वे बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. याला कारण आहे सत्तेचा मोह.
एकनाथराव शिंदे यांच्या बंडाच्या आधीपासून काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस

हे भिन्न विचारसरणीचे पक्ष असतानाही सत्तेसाठी तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यानंतर एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेच्या तत्वांवरच उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जात सत्ता स्थापन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे म्हणत अजित दादा पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
पण अवघ्या काही महिन्यांतच अजित दादा पवार हे एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत आले व उपमुख्यमंत्री देखील झाले.
सध्याच्या निवडणुकांचा विचार केला, तर काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यातील दुरावा कुठेतरी संपताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रितपणे निवडणुका लढवीत आहेत.
त्यांच्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील बऱ्याच महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांचा पक्षही एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे चित्र आहे. म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसह सत्तेत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेपुरती त्यांची युती शरद पवार यांच्या पक्षासोबत होत आहे.
काही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस सत्तेत आहेत. एकंदरीत सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी राजकीय पक्षांची दिसून येते. अगदी स्वतःच्या पक्षाची तत्वे सोडतानाही ते मागे-पुढे पाहत नाहीत.
पूर्वी काही पक्षांनी आपली तत्वे शेवटपर्यंत जपली होती, जसे की शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष. या पक्षांनी कधीही आपल्या मूलभूत विचारांशी तडजोड केली नाही. पण आजचे चित्र मात्र वेगळे दिसत आहे.
मोठ्या निवडणुकांमध्ये युती, पण स्थानिक निवडणुकांमध्ये नाही
लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार केला, तर आघाडी-युतींमध्ये लगेच जागा वाटपाचा फार्म्युला आणि उमेदवारांची नावे निश्चित होतात. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र असे होताना दिसत नाही.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती येथे पक्ष एकत्रित निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नसतात. अनेकदा आघाडीतील किंवा युतीतील पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवतात. यालाच ‘मैत्रीपूर्ण लढत’ असे गोंडस नाव दिले जाते.
हे ही वाचा-लोक झोपेत का बोलतात? डॉक्टरांचे म्हणणे काय ?
मात्र या निवडणुका पार पडल्यानंतर सत्ता कोणाची येणार आणि पुढील राजकीय दिशा काय असणार, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय दुरावा वाढतो. पण विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये हा दुरावा कमी होताना दिसतो.
स्वतःच्या निवडणुकीच्या वेळी नेतेमंडळी युती-आघाडी करतात, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये मात्र त्यात रस दाखवत नाहीत, हे वास्तव आहे.
विरोधी पक्ष हरवला आहे का?
एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर एकच उत्तर समोर येते की विरोधी पक्ष हरवलेला आहे. सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत असतील, तर विरोध नेमका कोणी करायचा आणि कोणाला करायचा, हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो.
हेही वाचा-लोक झोपेत का बोलतात? डॉक्टरांचे म्हणणे काय ?
विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्यामुळे अनेक वेळा जनतेचे प्रश्न कोण मांडणार, हा प्रश्न उपस्थित होतो.
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील आणि शिवसेना पक्षाच्या विरोधात काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष हे सर्व एकत्र येऊन निवडणूक लढवताना दिसले. हे चित्र देखील महाराष्ट्राने पाहिले आहे.
https://youtu.be/kHg4PedRLk8?si=Pt6WGvKHPsXA4psM
या सर्व परिस्थितीमुळे सामान्य मतदारांच्या मनात एकच प्रश्न उरतो—मग विरोधी पक्ष कोणता?
मला असे वाटते की महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हरवला आहे. आम्हाला तो सापडलेला नाही. तुम्हाला सापडला असेल, तर नक्की कमेंटमध्ये कळवा.







