मनोज जारांगे पाटील यांच्या विधान मुळे सर्वांचे डोळे पाणावले
या मेळाव्यासाठी पोलिसांनी परवानगी देताना तब्बल १९ अटी घातल्या होत्या

नारायणगडावरील दसरा मेळावा : मनोज जरांगे पाटील यांचे भावुक विधान
आज नारायणगड येथे दसरा मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केले. तब्येत ठीक नसतानाही ते सभेला आले आणि बोलताना त्यांच्या एका विधानामुळे सर्वांचेच डोळे पाणावले.

नारायणगडावरील दुसऱ्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील भावुक झाले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले, “मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. शेवटी हे शरीर आहे, याचं काही सांगता येत नाही. पण जेव्हा मी तुम्हाला मुंबईला जायचे अशी हाक दिली तेव्हा तुम्ही मला साथ दिली. माझ्या गरीबाच्या लेकरांच्या आयुष्याचे कल्याण करून द्या, असे मी सांगितले होते. मला मराठा समाजाला आरक्षण मिळालेले पाहिजे आहे. ही संधी सोडू नका, मागे हटू नका. कोणी काही म्हटलं तरी मागे सरकू नका. एक राहा. तुम्ही जर आत्ताच साथ दिलीत तर आपल्या समाजाच्या लेकरांच्या भवितव्याचे कल्याण होऊ शकते. अशी संधी सोडू नका.”
मुंबईत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, तब्बल ७५ वर्षांनंतर मराठ्यांनी हैदराबाद गॅझेटचा जीआर घेऊन ही लढाई जिंकली आहे. आंदोलनामागचं कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, “माझा समाज तडफडत होता. हे सर्व मला बघवत नव्हते. म्हणूनच मी आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले.

मी कधीही माझ्या समाजाशी खोटं बोललो नाही. मला नाटक करता येत नाही. परिस्थितीनुसार कधी दोन पावलं मागे घ्यावी लागली, तरी माझा उद्देश कधीच सोडला नाही. मराठा समाजातील पोराबाळं, लेकी-बाळी यांना मोठं करायचं होतं. आपल्याकडे शेती आहेच, पण त्यासोबत आरक्षणाचा आधारही महत्त्वाचा होता. म्हणून आम्ही रात्रंदिवस झटत राहिलो. माझ्या समाजाची इच्छा होती की त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहावं लागू नये.”
हे हि वाचा –MSP2026-केंद्र सरकारने रब्बी हंगाम 2026-27 साठी नवे हमीभाव जाहीर केले
पुढे ते म्हणाले की, “तुमच्या पाठिंब्यामुळे मी ७५ वर्षांची लढाई जिंकली. आता मी थोड्या दिवसांचा पाहुणा असो वा जास्त दिवसांचा, याचा मी विचार करत नाही. कारण जीवनात मला जे करायचं होतं ते मी सिद्ध केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, हा माझ्या आयुष्याचा उद्देश होता आणि तो मी सफल केला. आता तुम्हीच शासक व्हा आणि प्रशासक व्हा. जर तुम्ही शासक व प्रशासक झालात तर कोणाकडे काही मागावं लागणार नाही. जातीला सांभाळा.”
हे हि वाचा –हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक माहिती: कारणे, लक्षणे, तपासण्या आणि उपचार
या मेळाव्यासाठी पोलिसांनी परवानगी देताना तब्बल १९ अटी घातल्या होत्या. त्यात प्रक्षोभक भाषण करणार नाही, दोन समाजात तणाव निर्माण करणारे वक्तव्य करणार नाही, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे व त्याठिकाणी स्वयंसेवक नेमणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करणे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत केलेल्या नियमांचे पालन करणे अशा अटींचा समावेश होता.
तब्येत खालावलेली असूनही हा मराठा योद्धा आपल्या समाजासाठी दसरा मेळाव्यात हजर राहिला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.







