FSSAI चा इशारा,गंजलेले किंवा तुटलेले चाकू वापरताय?
हॉटेल्स आणि खाद्य स्टॉलच्या तपासणीत उघड झाले धक्कादायक वास्तव; डॉक्टरांनी सांगितले संभाव्य आजारांचे धोके

FSSAI

गंजलेले किंवा तुटलेले चाकू ठरू शकतात आरोग्यासाठी धोकादायक; FSSAI च्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर
नवी दिल्ली : हॉटेल, खानावळी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकघरातील
साधनांच्या स्वच्छतेबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडेच करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये अनेक ठिकाणी गंजलेले, तुटलेले किंवा खराब अवस्थेतील चाकू अन्न तयार
करण्यासाठी वापरले जात असल्याचे आढळून आले आहे. तज्ज्ञांच्या मते,
अशा चाकूंचा वापर ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गंजलेल्या सूक्ष्म धातूचे कण अन्नामध्ये मिसळू शकतात.
हेही वाचा-हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते?
हे कण शरीरात गेल्यास पोटदुखी, पचनसंस्थेचे विकार, उलट्या, मळमळ आणि संसर्ग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आरोग्याच्या
समस्या असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.
तसेच, तुटलेले किंवा धार खराब झालेल्या चाकूंमध्ये अन्नाचे सूक्ष्म कण अडकून राहू शकतात.
योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्यास या ठिकाणी जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतू वाढण्याची शक्यता असते.
अशा दूषित चाकूंचा वापर पुन्हा अन्न तयार करताना केल्यास अन्नविषबाधा (फूड पॉइझनिंग) होण्याचा धोका वाढतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्वयंपाकघरातील उपकरणांची नियमित तपासणी आणि स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
चाकूंवर गंज दिसल्यास किंवा ते तुटलेले असल्यास त्यांचा तात्काळ वापर बंद करून नवीन चाकू वापरणे गरजेचे आहे.
स्टेनलेस स्टीलचे उच्च दर्जाचे चाकू वापरणे आणि त्यांची नियमित निर्जंतुकीकरण प्रक्रिया करणेही महत्त्वाचे आहे.
FSSAI ने खाद्य व्यवसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी स्वयंपाकघरातील उपकरणांची स्वच्छता आणि गुणवत्ता राखणे
ही प्रत्येक खाद्य व्यवसायिकाची जबाबदारी असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, ग्राहकांनीही बाहेर जेवताना स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अन्न तयार करताना वापरली जाणारी साधने स्वच्छ आहेत का, याबाबत जागरूक
राहिल्यास अनेक आरोग्यविषयक धोके टाळता येऊ शकतात.
ज्या पद्धतीने FSSAI हॉटेल्स यांना सूचना दिला आहेत तशा सूचना आपण देखील आपल्या घरी पाळाव्यात आणि गंजलेला चाकू आपण किचनमध्ये वापरू नये







