‘No PUC No Petrol’ नियम लागू; PUC नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल-डिझेल
वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी CAQM चा मोठा निर्णय; ANPR प्रणालीद्वारे होणार वाहनांची तपासणी

No PUC No Petrol Rule
नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली सध्या वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. अनेक उपाययोजना करूनदेखील दिल्लीतील वायू प्रदूषण काही कमी होत नाहीये. आता पुढचे कडक पाऊल उचलत, ज्या वाहनांकडे PUC नाही त्या वाहनांना दिल्ली NCR मध्ये पेट्रोल-डिझेल मिळणार नाही.
दिल्ली NCR मध्ये वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता CAQM यांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली NCR मध्ये ज्या वाहनांकडे PUC सर्टिफिकेट नाही, अशा वाहनांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही.

नो PUC, नो पेट्रोल
वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्ली सरकार आणि CAQM म्हणजेच कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली NCR अंतर्गत येणाऱ्या सर्व पेट्रोल पंपांवर आता PUC सर्टिफिकेट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर एखाद्या वाहनाकडे PUC सर्टिफिकेट नसेल, तर त्या वाहनाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा-हाय ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी तीन प्रभावी योगासने; रोज करा आणि मिळवा आराम
हेही वाचा-चित्रपटसृष्टीतून राजकारणात यशस्वी झालेले दिग्गज कलाकार | MGR ते विजय थलपथी
विशिष्ट प्रणालीद्वारे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजेच ANPR या यंत्रणेद्वारे प्रत्येक पेट्रोल पंपावर PUC नसलेल्या वाहनांची ओळख पटवली जाईल. ज्यांच्याकडे PUC नाही, त्या वाहन चालकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही.
प्रत्येक पेट्रोल पंपावर ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यामुळे PUC नसलेल्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
हा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून अमलात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपले PUC प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घेण्याचे आवाहनदेखील CAQM ने केले आहे.
पिकांचे अवशेष जाळण्याबाबतही निर्णय
तथापि, विशिष्ट परिस्थितींमध्ये सूट दिली जाणार आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था कर्तव्ये, आपत्ती निवारण कार्य आणि राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या वाहनांना PUC शिवाय इंधन मिळू शकणार आहे.
आयोगाने दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह संबंधित राज्यांना ही प्रणाली प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत पिकांचे अवशेष जाळणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे यावरही चर्चा करण्यात आली.
पंजाब आणि हरियाणामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या वाढत्या घटनांवर आयोगाने चिंता व्यक्त केली असून, राज्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
NCR प्रदेशातून पिकांचे अवशेष जाळणे पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने २०२६ साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे मंजूर करण्यात आली आहेत.
दरम्यान, स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी CAQM ने दिल्ली-NCR मध्ये L-5 श्रेणीतील तीन चाकी वाहनांची नोंदणी टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत १ जानेवारी २०२७
पासून दिल्लीत आणि १ जानेवारी २०२८ पासून गुरुग्राम, सोनीपत, गाझियाबाद, फरिदाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथे केवळ इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांची नोंदणी केली जाईल.







