
ऑपरेशन टायगर यशस्वी
सध्या राज्यामध्ये पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर महाराष्ट्रामध्येही वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.
ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. त्या
बैठकीमध्ये काही खासदारांनी आपली प्रत्यक्ष उपस्थिती लावली नाही आणि त्यावरूनच ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा
सुरू झाली. मात्र, त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आमच्या पक्षामध्ये कोणतीही फूट नसल्याचे स्पष्ट केले. परंतु काल रात्री घडलेल्या
काही घडामोडींमुळे लवकरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बैठकीला खासदार गैरहजर
उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या बैठकीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश
पाटील आष्टीकर तसेच ओमराजे निंबाळकर हे उपस्थित नव्हते. हे सर्वजण ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते, असा दावा ठाकरे
गटाच्या काही बड्या नेत्यांनी केला. जे खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याबाबत
सूचना देखील करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर अवघ्या एका दिवसात नांदेड
विमानतळावरून काही खासदार दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर?
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या चर्चा आहेत. तसेच शिवसेनेचे सहा
खासदार, ज्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि
संजय देशमुख यांचा समावेश आहे, हे त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.
यावरूनच ‘ऑपरेशन टायगर-२’ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. नेमके उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना किती खासदार भेटले याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, किमान
सहा खासदार त्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद
आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन टायगर’बाबत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. याप्रसंगी
बोलताना त्यांनी, “जे खासदार आम्हाला सोडून जातील, त्यांना आम्ही बघून घेऊ,” असे वक्तव्य केले. “ऑपरेशन टायगर
राबविणार आहेत म्हणजे आम्ही टायगर आहोत, हे त्यांनी मान्य केले,” असेही संजय राऊत म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी आम्ही अधिकृत व्हीप काढल्याचेही नमूद केले. तसेच यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
यांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. या खासदारांना १५ कोटी रुपये मिळाल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी
पत्रकार परिषदेत केला. त्यानंतरच हे खासदार विमानात बसल्याचा आरोपही त्यांनी केला.
ऑपरेशन टायगर चा अर्थ बहुदा संजय राऊत यांना कळाला नाही असे दिसते?
कारण की शिवसेना शिंदे गटाने सहा खासदार त्यांच्याकडे वळवून घेतले यावरून टायगर कोण हे लक्षात येते
ऑपरेशन टायगर आत्ताच का?
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे
राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे तब्बल २० खासदार फुटल्याचे सांगितले जात आहे.
त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून एनडीएला पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे.
उबाठाचे गटाचे सहा खासदार शिवसेनेत विलीन झाले आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना मान्यता देखील उद्याची चर्चा आहे
आपल्या पक्षाचे वजन पुन्हा एकदा दिल्ली दरबारात वाढविण्यासाठीच ‘ऑपरेशन टायगर’ची प्रक्रिया सुरू असल्याची
चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. जर ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटले, तर त्याचा निश्चित फायदा शिवसेना शिंदे
गटाला होईल. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसमधील घडामोडींनंतर लगेच ‘ऑपरेशन टायगर’
सुरू झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
वारंवार होणाऱ्या पक्षफुटींमुळे सामान्य मतदार मात्र संभ्रमात पडला आहे.
आपण मतदान कोणाला केले होते आणि सध्या नेमके काय सुरू आहे,
असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला आहे. यावरून नेत्यांमध्ये नीतिमत्तेची कमतरता असल्याचे दिसून येते.
सत्ता येतात आणि जातात, पण राजकीय पक्षांचे अस्तित्व त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून असते.
जर अशा पद्धतीने राजकीय नेते आपली विचारसरणी सोडून दुसऱ्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये जात
असतील, तर विचारसरणीचे महत्त्व काय, हा प्रश्न मतदारांच्या मनात उपस्थित होत आहे.







