
घड्याळ ठरली अजित दादांची शेवटची ओळख
आज सकाळी एका विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्या विमानात असलेल्या सहा जणांची ओळख पटवावी लागली. यामध्ये अजितदादा पवार यांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली, ते पाहूया.

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज सकाळी मुंबईहून एका खाजगी विमानाने बारामतीकडे येण्यासाठी निघाले होते. हे विमान बारामती विमानतळावर पोहोचले होते; मात्र लँडिंगच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये अजितदादा पवार तसेच त्यांचे इतर सहकारी यांचे दुःखद निधन झाले आहे.
अपघात कसा झाला?
सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी अजितदादा पवार ज्या विमानात बसले होते, ते विमान बारामती विमानतळाच्या जवळ कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विमानाने सुरुवातीला काही काळ घिरट्या घातल्या आणि
त्यानंतर अचानक स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर तेथील नागरिक पाणी घेऊन विमानाच्या दिशेने धावले. काही वेळातच पोलीस तसेच इतर नागरिक घटनास्थळी पोहोचले. विमानाची आग विझवल्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले.
या प्रसंगी अजितदादा पवार यांच्या हातातील घड्याळ हीच त्यांची शेवटची ओळख ठरली. याच घड्याळाच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. अजितदादा पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक निशाणीही ‘घड्याळ’ असल्याने, अजितदादांची शेवटची ओळख देखील घड्याळच ठरली आहे.
अजितदादा पवार यांनी शेवटचा फोन कोणाला केला?
अजितदादा पवार यांनी मुंबईहून बारामतीकडे जाण्यापूर्वी शेवटचा कॉल भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजीतसिंग पाटील यांना केला होता. थोडा वेळ बोलल्यानंतर, “मी बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर तुझ्याशी बोलतो,” असे अजितदादांनी राणा जगजीतसिंग पाटील यांना सांगितले होते.
महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे. “काम हीच माझी ओळख,” असे अजितदादा सतत म्हणत असत. विमान कोसळलेल्या परिसरात सर्वत्र फाइल्स व कागद पडलेले दिसत होते. यावरून अजितदादा कामाबाबत किती तत्पर होते, हे स्पष्ट होते.
या अपघातामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. एक दूरदृष्टीचा नेता राज्याने गमावला असून, अजितदादा यांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.







