कमी बजेटच्या गुजराती चित्रपटाने मोडले कमाईचे रेकॉर्ड
2025 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णकाळ ठरले

हे वर्ष 2025 हे चित्रपटसृष्टीसाठी चांगले वर्ष राहिले आहे. यंदा अनेक चित्रपटांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. विशेष म्हणजे यातील काही चित्रपट हे कमी बजेटचे असूनदेखील त्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली.
त्यामुळे यंदाचे वर्ष हे सिनेमा निर्माते आणि सिनेमा क्षेत्रातील इतर सर्वांसाठी चांगले राहिल्याचे चित्र दिसत आहे. यंदा एका गुजराती चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा 240 पट जास्त कमाई केली आहे. तो चित्रपट कोणता, ते पुढे पाहूया.
2025 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी चांगले गेले
गुजराती चित्रपटसृष्टीची फारशी चर्चा सहसा ऐकायला मिळत नाही. यामागे सेन्सर बोर्डाच्या काही अटी कारणीभूत असल्याने गुजरातच्या बाहेर हे चित्रपट क्वचितच प्रदर्शित होताना दिसतात. मात्र यंदाचे वर्ष गुजराती चित्रपटसृष्टीसाठी अतिशय चांगले गेले आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे अवघ्या 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार केलेल्या एका छोट्याशा गुजराती चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले.
या चित्रपटामध्ये कोणताही मोठा स्टार नव्हता, कोणतीही भव्य अॅक्शन नव्हती आणि गाण्यांचा भरणाही नव्हता. तरीसुद्धा या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा तब्बल 240 पट जास्त कमाई केली. या चित्रपटाचे नाव आहे ‘लालो कृष्ण सदा सदा सहायते’.
हा चित्रपट एक गुजराती भक्ती नाटक म्हणून उदयास आला आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे एकूण बजेट 50 लाख रुपये होते. मात्र कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने गुजराती चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडले. विशेष म्हणजे हा पहिला गुजराती चित्रपट ठरला आहे, ज्याने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
हेही वाचा-या अगरबत्तीवर येणार बंदी?
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची एकूण कमाई 121 कोटी रुपये इतकी झाली. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक फायदेशीर चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे. टक्केवारीचा विचार केला, तर हा चित्रपट सुमारे 24000 टक्के यशस्वी ठरला असून त्याचा नफ्याचा दर सुमारे 6000 टक्के इतका आहे.
हेही वाचा-लोक झोपेत का बोलतात? डॉक्टरांचे म्हणणे काय ?
एकीकडे हाय बजेट चित्रपट कधी कधी अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरतात, तर दुसरीकडे ‘लालो कृष्ण सदा सदा सहायते’सारखे चित्रपट आपल्या मर्यादित बजेटमध्ये प्रचंड यश मिळवून दाखवतात.
https://en.wikipedia.org/wiki/Laalo_%E2%80%93_Krishna_Sada_Sahaayate
या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकित सखिया यांनी केले आहे. चित्रपटाची कथा कृष्णाश वाजा, विकी पोर्णिमा आणि अंकित सखिया यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा एका रिक्षा चालकाभोवती फिरते, जो एका फार्महाऊसमध्ये अडकतो आणि त्या ठिकाणी त्याला साक्षात भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होते.
या चित्रपटात मुख्य भूमिका रीवा रक्ष, सृहद गोस्वामी, करण जोशी आणि मिस्टी कडेचा यांनी साकारल्या आहेत. तर या चित्रपटाचे निर्माते अजय पडारिया आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील यंदाचे हिट चित्रपट
यंदाचे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही अतिशय चांगले ठरले आहे. अनेक हिंदी चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याने मागील वर्षी झालेले काहीसे नुकसान भरून निघाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
‘सैयारा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षकांचे अश्रू अनावर झाले होते. नव्या पिढीतील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले.
डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंदर’ या चित्रपटानेही चांगलीच कमाई केली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली. ‘छावा’ आणि ‘धुरंदर’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अक्षय खन्ना यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटालाही प्रचंड यश मिळाले. एकंदरीत विचार केला, तर यंदाचे वर्ष हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे.
आगामी काळात अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे येणारे वर्षही 2025 प्रमाणेच चित्रपटसृष्टीसाठी चांगले जाईल, अशी अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.





