षट्कर्म म्हणजे काय? नेतीसह षट्कर्मांचे प्रकार, फायदे व योग्य पद्धत

षट्कर्म
षट्कर्मला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा भाग मानला जातो. याच षट्कर्मांच्या आधारे ऋषीमुनी निरोगी, रोगमुक्त, स्वस्थ व पुष्ट आयुष्य जगत होते. या षट्कर्मांचे फायदे काय आहेत व ते कसे केले जातात,षट्कर्म याविषयी आपण चर्चा करूया.
षट्कर्माबाबत ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे ते पाहूया.
“षट्कर्म निर्गत स्थौल्यः कफदोष मलाधिकाः |
प्राणायामं ततः कुयादनेन सिध्यती ||”
याचा मराठीत अर्थ होतो की, षट्कर्मांच्या या क्रिया स्थूल शरीराला शुद्ध करत असून सूक्ष्म शरीराच्या शुद्धीकरणात अत्यंत सहाय्यक ठरतात. नियमित सरावाने या क्रिया करता येतात. अनेक रोग आपल्याला होत नाहीत. यामध्ये सर्व प्रकारचे वातरोग, कफरोग, कुष्ठरोग, पित्तरोग, उदररोग, हृदयविकार, फुफ्फुसांचे रोग, मूत्राचे रोग आदी विकार दूर होतात.
षट्कर्मांचे प्रकार
यामध्ये प्रामुख्याने धौती, त्राटक, बस्ती, नेती, नौती व कपालभाती या सहा कर्मांचा समावेश आहे. सतत सराव केला तर याचे अनेक फायदे पाहायला मिळतात, पण सराव हा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
नेती म्हणजे काय
नेतीचे काही प्रकार पाहूया. यामध्ये जलनेती, सूत्रनेती, घृतनेती, तेलनेती, दुग्धनेती यांचा समावेश होतो.
https://en.wikipedia.org/wiki/Shatkarma
जलनेती
सकाळची वेळ ही नेतीसाठी चांगली असते. यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम शेंदी मीठ टाकून पाणी कोमट करतात. नंतर हे पाणी एका विशिष्ट तांब्यामध्ये भरले जाते व त्या तांब्याला एक नळी असते. त्या नळीद्वारे उजव्या नाकपुडीला लावून डाव्या बाजूची नाकपुडी थोडी खाली करून, तोंड थोडे उघडे ठेवून

श्वासोच्छ्वास तोंडाने घेतला जातो आणि दुसऱ्या नाकपुडीतून पाणी बाहेर पाडले जाते. असेच नंतर दुसऱ्या नाकपुडीतून करून पाणी बाहेर काढले जाते. अशा प्रकारे जलनेती केली जाते.
जर कफरोग नसेल तर मीठ न घालता थंड पाण्याने देखील सुरुवात करता येते. पण ज्यांना कफरोग आहेत त्यांनी कोमट पाण्यानेच नेती करणे फायद्याचे असते. नेती झाल्यानंतर कपालभाती क्रिया देखील करायला पाहिजे, म्हणजे उर्वरित पाणी शरीराच्या बाहेर फेकले जाईल.
सूत्रनेती
सूत्राने बनवलेली एक दोरी, जिला सूत्रनेती म्हणतात, तिच्याद्वारे ही क्रिया केली जाते. सूत्रनेती नाकपुडीत घालण्याआधी पाण्याने ओली केली जाते. भिजल्यानंतर थोडी वाळवून, जिथे सूत्रनेतीवर मेण लावलेले असते तिथून ती वळवली जाते, ज्यामुळे नेती सहज नाकपुडीत प्रविष्ट होते. उजव्या नाकपुडीतून ती घालून तोंडातून बाहेर आल्यानंतर हाताच्या मदतीने हळूहळू बाहेर काढली जाते. सूत्रनेती केल्यानंतर ताबडतोब घृतनेती किंवा तेलनेती केली पाहिजे.
घृतनेती
झोपून थोडे डोके खाटेवर वर करून मागे घ्यावे. नंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा ड्रॉपरच्या साहाय्याने आठ ते दहा थेंब कोमट तूप नाकपुडीत टाकावे. यालाच घृतनेती असे म्हणतात.
हेही वाचा-भविष्यात हृदयरोग टाळायचा असेल तर या तपासण्या वेळेवर करा
ही वाचा-सीजन बदलताच सर्दी-खोकला, ताप का वाढतो?
तेलनेती
तेलनेतीसाठी खुर्चीवर बसून अथवा खाटेवर झोपून डोके मागे घ्यावे व ड्रॉपर किंवा चमच्याच्या साहाय्याने नाकपुडीत आठ ते दहा थेंब कोमट तेल घालावे आणि थोडा वेळ तसेच राहावे. यालाच तेलनेती असे म्हणतात.
दुग्धनेती
तेलनेतीप्रमाणेच दुग्धनेतीमध्ये देखील खुर्चीवर किंवा खाटेवर बसून डोके मागे करून, ड्रॉपर किंवा चमच्याच्या साहाय्याने आठ ते दहा थेंब दूध नाकपुडीत टाकायचे असते. यामध्ये दूध हळूहळू पिऊन टाकले तरी चालते.
घृतनेती, तेलनेती व दुग्धनेती यामुळे मुख्यतः कपाळाचे शुद्धीकरण होते. यामुळे डोळ्यांचे रोग, गळ्याचे रोग व डोक्याचे विकार दूर होतात. तसेच सर्दी, पडसे, कफाचे रोग नक्कीच दूर होतात. नेत्रविकार, केस पांढरे होणे, डोकेदुखी यामध्ये देखील नेतीचा खूप मोठा उपयोग होतो. बाह्य वातावरणातील प्रदूषण, धुळीचे कण, धूर, शीतलता, उष्णता व रोगांपासून संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी असते, त्यावर देखील नेती रामबाण सिद्ध होत आहे.
हळूहळू सराव करून नेती सहज करता येते, पण यामध्ये सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नेतीचा सराव नेहमी ज्या व्यक्तीला किंवा वैद्याला नेती नीट जमत असेल, अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करावा. स्वतःच्या मनाने करू नये.
टीप :
नेतीबद्दल माहिती असलेल्या व्यक्तीकडूनच याचा सराव करून घ्यावा. सदरील लेख हा फक्त तुमच्या माहितीसाठी आहे, वैद्यकीय उपचारासाठी नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. या लेखामधील माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केलेली आहे.







